नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एका भाऊबंदाची बळकावलेली वडिलोपार्जित जमीन परत करण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागून त्यापोटी दीड लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्या-प्रकरणी प्रकाश लोंढे व दीपक लोंढेसह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मच्छिंद्र रघुनाथ बोडके (रा. मोह, ता. सिन्नर) व त्यांच्या भाऊबंदांना आरोपी दीपक ऊर्फ नाना लोंढे, प्रकाश लोंढे, प्रमोद मनोहर आव्हाड, गणेश श्रीधर आडके व इतर दहा ते बारा इसमांनी जिवे मारण्याची धमकी देऊन व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना बळजबरीने आरोपींनी त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून शिवीगाळ करीत सिन्नर येथील सबरजिस्ट्रार कार्यालयात नेले.
तेथे लोंढे पितापुत्रांसह इतर आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या भाऊबंदांकडून मोह गावातील गट नंबर 294/2 मधील 4 हेक्टर 90 आर अशी वडिलोपार्जित सामाईक शेतजमीन बळजबरीने आरोपींनी त्यांच्या लाभात लिहून घेतली. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या भाऊबंदांना पुन्हा त्याच गाडीत बसवून आयटीआय पूल सातपूर येथील प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात आणून तेथील आरोपी दीपक लोंढे याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची भीती घालून रात्री 9 वाजेपर्यंत या सर्वांना कोंडून ठेवले.
जमिनीची खरेदी झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी फिर्यादी बोडके व त्याच्या कुटुंबीयांनी आरोपी दीपक लोंढे व प्रकाश लोंढे यांना भेटून बळकावलेली शेतजमीन परत करण्याची विनवणी केली असता लोंढे पितापुत्राने शेतजमीन परत करण्याच्या मोबदल्यात फिर्यादी व त्यांच्या भाऊबंदांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास शेतजमिनीचा नाद सोडण्यास सांगून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादीसह त्याच्या भाऊबंदांची शेतजमीन नावावर करण्यापोटी 1 लाख 50 हजार रुपये घेऊनही लोंढे पितापुत्राने ही जमीन फिर्यादीच्या व नातेवाईकांच्या नावावर केली नाही, तसेच लोंढे पितापुत्रासह इतर बारा आरोपींनी ही शेतजमीन बळजबरीने लिहून घेतलेल्या खरेदी खतात त्यांच्या मनाप्रमाणे नमूद केलेली 50 लाख रुपयांची रक्कम फिर्यादीसह त्याच्या भाऊबंदांना दिली नाही.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दीपक लोंढे व प्रकाश लोंढे यांच्यासह बारा इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करीत आहेत.