पळसे शिवरात बिबट्या जेरबंद, शिंदे-पळसे परिसरातील रहिवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास
पळसे शिवरात बिबट्या जेरबंद, शिंदे-पळसे परिसरातील रहिवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : शिंदे-पळसे परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने सापळ्यात पकडण्यात यश मिळवले आहे. पळसे गट नं. ५९५ येथील शेतकरी विनोद बबनराव जाधव यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे सुमारे तीन ते चार वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला.



गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते. परिणामी शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान परिसरातील काही जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा देखील बिबट्याने फडशा पाडला होता. शिंदे, पळसे, मळे, परिसरात बिबट्याचे वावराचे ठसे वारंवार दिसत असल्याने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली होती.

गावकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे तक्रारी नोंदविल्यानंतर अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल अहिरराव यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून गट नं. ५९५ येथे पिंजरा लावला होता. आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातून बिबट्याच्या डरकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. लगेचच गावकरी धाव घेत घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्या अखेर सापळ्यात अडकला असल्याचे स्पष्ट झाले.

पिंजऱ्यात पकडलेला बिबट्या म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात शिंदे आणि पळसे पंचक्रोशीत अनेक जनावरे ठार झाली वारंवार शेतकरी नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पिंजरे वाढविणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे आणि जनजागृती मोहीम राबविणे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

 शिंदे व पळसे गाव येथील नागरिकांनी सांगितले की, “बिबट्याचा बंदोबस्त झाल्याने गावात आता थोडा दिलासा मिळाला असला तरी ही समस्या कायमची सुटली नाही. परिसर बागायती असल्याने बिबट्यांचे वास्तव्य वारंवार दिसते, म्हणून अतिरिक्त पिंजरे आणि रात्रगस्त अत्यावश्यक आहे.”

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट्या पकडला असला तरी अजून इतर बिबट्यांचा वावर असू शकतो, त्यामुळे रात्री उशिरा बाहेर न पडणे, एकटे फिरू नये व जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group