नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ओपन हार्ट सर्जरीसाठी व्याजाने घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या व्याजाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराने एका वृद्धाला बंदुकीचा धाक दाखवून तिच्या बंगल्यावर कब्जा केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भास्कर नाना माळोदे (वय 71, रा. श्रीरामनगर, आडगाव शिवार) यांना नातू साई (मयत) याच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी आरोपी सिद्धेश्वर रामेश अंडे याने फिर्यादी यांना भेटून त्यांना आडगाव शिवारातील वृंदावननगर येथे आईसाहेब नावाच्या बंगल्यात मुख्य आरोपी कैलास मैंद हा सावकार असून, तो व्याजाने पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपी अंडे याने फिर्यादींना कैलास मैंद याच्याकडे नेले. मैंद याने तीन लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने फिर्यादींना दिले. ही रक्कम देताना व्याजाच्या अॅडव्हान्स म्हणून तीस हजार रुपये वजा करून स्वत:कडे ठेवले.
फिर्यादी सप्टेंबर 2011 मध्ये व्याजाचा हप्ता देऊ शकले नाहीत. त्यामुळे खासगी सावकार कैलास मैंद व सिद्धेश्वर अंडे यांनी फिर्यादीच्या घरी येऊन व्याजाचा हप्ता वेळेवर देता येत नाही, तर कशाला पैसे घेता, आताच्या आता व्याजाचा हप्ता द्या, नाही तर तुमचे काही खरे नाही, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली. दरम्यान, दि. 12 ऑक्टोबर 2011 रोजी कैलास मैंद याने फिर्यादीचा मुलगा नितीन याला अज्ञातस्थळी डांबून ठेवले.
त्यावेळी दुसरा आरोपी सिद्धेश्वर अंडे याने त्याच्याजवळील बंदुकीचा धाक दाखविला आणि फिर्यादी माळोदे व त्यांची सून नूतन यांना चारचाकी गाडीमध्ये बसवून नाशिकरोड येथील रजिस्ट्रार ऑफिस येथे घेऊन गेले. तेथे गेल्यावर कैलास मैंद याने “तुम्ही सह्या केल्या नाहीत, तर तुमचा मुलगा तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर वृंदावननगर येथील बंगला सिद्धेश्वर अंडे यास विक्री करीत असल्याच्या खरेदी खतावर बळजबरीने सही करण्यास भाग पाडून फिर्यादीच्या बंगल्यावर कब्जा केला.
हा प्रकार ऑगस्ट 2011 ते सन 2019 या कालावधीत घडला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात कैलास मैंद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.