नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळी गंगापूर रोडवरील आनंदवली, गुरुजी रुग्णालय परिसरातील मनपाच्या डीपी प्लॅनमधील असलेल्या आरक्षित जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटविले.
गंगापूर रोडवरील आनंदवल्ली भागात गुरुजी हॉस्पिटल रुग्णालयालगत सर्व्हे नंबर 16 येथील जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याच्या तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या होत्या. या जागेसंबंधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले होते. मनपाचा डीपी प्लॅन असलेल्या या जागे संदर्भात कोर्टाकडून महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने आज सकाळी मनपाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली.
या जागेवर गॅरेज, हॉटेल, वेल्डिंग दुकाने, चिकन मटन विक्री केंद्र, घरे असे अतिक्रमण करण्यात आले होते. मनपाच्या पथकाने अखेर यावर कारवाई करीत सुमारे वीस ते पंचवीस दुकाने, घरे, गॅरेज, हॉटेल आदी जमीन दोस्त केले. त्याकरिता 3 जेसीबी, 2 कटर व मनपाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे सहा ते सात ट्रक भरून हे सर्व अतिक्रमण काढण्यात आले.
या अतिक्रमणामुळे परिसरातील रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी व वाहन चालकांनी वेळोवेळी तक्रारीही केल्या होत्या. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर फारशी कारवाई केली जात नव्हती, अखेर कोर्टाने मनपाच्या बाजूने निकाल दिल्याने या रिझर्वेशन केलेल्या डीपी प्लॅन जागेवरील अतिक्रमण मोकळे केले.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, अतिक्रमण उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, सहाय्यक अधिकारी एस. आर. चौधरी, राजेंद्र भोरकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक नितीन संधान त्याचबरोबर मनपाच्या तीनही विभागातील अतिक्रमण पथके व सुमारे शंभर ते सव्वाशे अधिकारी, कर्मचारी आदी फौज फाट्याच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.