नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शिवाजीनगर येथील एका इसमाचा खून करुन फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात अंबडच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी रोहित थापा हा गुन्हा घडल्यापासून 1 वर्षापासून फरार होता. दि. 9 मे 2024 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील महात्मा फुले गार्डन येथे रितेश माथे (वय 26) व आरोपी अरबाज मोहम्मद शेख, संजय प्रधान व इतर दोन अनोळखी इसमांचे वाद झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरुन या टोळक्याने रितेश माथेवर धारदार शस्त्राने वार करुन त्याला ठार केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शुभम बाळासाहेब जाधव, अरबाज मोहम्मद शेख व संजय उर्फ अतुल गणेश प्रधान यांना अटक केली होती. मात्र रोहित थापा हा गुन्हा घटल्यापासून फरार होता. तो इंदोर, रत्नागिरी व पुणे येथे अस्तित्व लपवून वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने पोलिसांनी रोहित थापाच्या नातेवाईकांशी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त करुन रोहित थापा पुण्यात असल्याची माहिती मिळवली. त्यावरुन 10 नोव्हेंबर रोजी बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायगुडेनगर येथे पोलिसांनी सापळा रचून रोहित हमबहाद्दूर थापा (वय 22) याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.