नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : टेररिस्ट फंडिंग व मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्याचा धाक दाखवून तपासाच्या नावाखाली सायबर भामट्यांनी एका इसमाची 66 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे नाशिक येथे राहतात. फिर्यादी राहत्या घरी असताना त्यांना एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून व्हिडिओ कॉल व व्हाईन कॉल करून एका व्यक्तीने संपर्क साधला.
फिर्यादीशी बोलणार्या व चॅटिंग करणार्या व्यक्तीने ते मुंबई पोलीस कार्यालयातून बोलत असल्याचे भासविले. अज्ञात व्यक्तीने “तुम्ही टेररिस्ट फंडिंग व मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभागी आहात,” असे सांगून फिर्यादीला या केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखविला. त्यानंतर या केसच्या तपासाच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादी यांना अॅक्सिस बँक व बँक ऑफ बडोदा या बँकांच्या खात्यांवर एकूण 66 लाख 47 हजार 142 रुपये ट्रान्स्फर करण्यास फिर्यादीला भाग पाडले.
हा प्रकार 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत फिर्यादीच्या घरी मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चॅटिंग करणारे अज्ञात इसम व पैसे वर्ग झालेल्या बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.