नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एमआयडीसीमधून बोलत असल्याचे भासवून कंपनीच्या पाण्याचे बिल थकित असून, ते बंद करण्यात येईल, असे सांगून अज्ञात इसमाने कंपनी मालकाला 16 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांना एका मोबाईल फोन, व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. एमआयडीसीमधून बोलत आहे, असे सांगून तुमच्या कंपनीचे पाण्याचे बिल भरलेले नसून, तुमच्या कंपनीच्या पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात येईल, असा मॅसेज पाठवून एमआयडीसी वॉटर बिल अपडेट अशी एपीके फाईल पाठवली.
त्याद्वारे फिर्यादीच्या गार्गी पॅकिंग इंडस्ट्रिज या कंपनीच्या एसबीआयच्या बॅक खात्यावरुन एकूण 12 लाख 84 हजार 835 रुपये व गार्गी अॅग्रो सर्व्हिसेस या कंपनीच्या एसबीआय बँक खात्यावरून 3 लाख 22 हजार 597 रुपये अशी एकूण 16 लाख 7 हजार 432 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
हा प्रकार दि. 14 ऑक्टोबर रोजी फोन व इंटरनेटद्वारे घडला. याप्रकरणी फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.