नाशिक : तक्रार मागे घेण्यासाठी कंपनीमालकाकडे मागितली तीन लाखांची खंडणी
नाशिक : तक्रार मागे घेण्यासाठी कंपनीमालकाकडे मागितली तीन लाखांची खंडणी
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एमआयडीसी कार्यालयात खोटी तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठी कंपनीमालकाकडे तीन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड एमआयडीसीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संजय पोपट महाजन (वय 56) यांच्या मालकीची अंबड एमआयडीसीत पूजा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. आरोपी संतोष शर्मा (रा. देवळाली कॅम्प) याने महाजन यांनी कंपनीच्या सामासिक अंतरात केलेले बांधकाम अवैध असल्याबाबतची खोटी तक्रार एमआयडीसी कार्यालयात केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तो फिर्यादी संजय महाजन यांच्याकडे तीन लाखांची खंडणी मागत होता.

खंडणीची रक्कम देण्यास महाजन यांनी नकार दिला असता आरोपी संतोष शर्माने फिर्यादी संजय महाजन व त्यांचा पुतण्या आशिष महाजन यांना कंपनीच्या बाहेरील एकांतात नेऊन पैसे दिले नाहीत, तर येथेच मुडदा पाडीन, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. कंपनीत केलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याची भीती घालून त्याने महाजन यांच्याकडून खंडणीच्या रकमेपैकी टोकन म्हणून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर शर्मा हा महाजन यांना उर्वरित दोन लाखांच्या खंडणीसाठी तगादा लावत आहे.

या प्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून संतोष शर्माविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शर्माला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुघले करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group