नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन किसान सभेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आले आहे.
किसान सभेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. कांदा निर्यात शुल्क रद्द करा, अशी मागणी किसान सभा नाशिक जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के लादली आहे, ती त्वरित रद्द करावी; अन्यथा किसान सभा तीव्र आंदोलन करेल, तसेच नाशिक जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी याची दखल घेऊन नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसह नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचविण्यासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेजची मदत करून शेतकरी व ठेवीदारांना दिलासा द्यावा, वनजमीन व गायरान जमीनधारक कसत असलेली जमीन नावावर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी कॉ. राजू देसले, भास्करराव शिंदे, नामदेव बोराडे, मधुकर मुठाळ, जगन माळी, सोहम शिरसाठ, शरद पवार, निवृत्ती कसबे, महादेव खुडे, विठ्ठल घुले आदी उपस्थित होते.