विभागीय आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे बहिण, भाऊ ताब्यात
नाशिकरोड (प्रतिनिधी) :- भूमि अभिलेखच्या गलथान कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमविल्यामुळे गेल्या महिनाभरापासून उपोषण करणाऱ्या बहिण-भावाला आज आत्मदहनाचा प्रयत्न करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील शिंगवे मातोबाचे गावातील योगेश खताळ व त्यांची बहीण अश्विनी खताळ यांचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून न्यायमिळेपर्यंत उपोषण सुरू आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे आपले वडिलोपार्जित क्षेत्र गमावण्याची वेळ योगेश खताळ व त्यांची बहीण अश्विनी खताळ यांच्यावर आली आहे. प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने हे उपोषण सुरू होते.
मात्र आज सकाळी आत्मदहनासाठी योगेश खताळ यांनी पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी वेळीच धाव घेत दोघा बहिण-भावाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.