येवला (वार्ताहर) :- शाळेच्या सुशोभीकरणाच्या कामात अडथळा न आणण्याच्या बदल्यात शाळा समितीच्या अध्यक्षांकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बदापूर ग्रामपंचायतीच्या सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
आरोपी रामनाथ उमाजी देवडे (वय 52) हे येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द-बदापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा बदापूर येथे शालेय समिती अध्यक्ष आहेत. या जि. प. शाळेला शासकीय निधीतून 7.30 लक्ष रुपये मंजूर झाले असून, या निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबागेचे काम चालू आहे. आरोपी रामनाथ देवडे यांनी तक्रारदार यांना ग्रामपंचायत सदस्या या नात्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती काल (दि. 14) 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्य देवडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन गोसावी व पोलीस नाईक अविनाश पवार यांनी केली.