लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणुक आयोगाची नजर
लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणुक आयोगाची नजर
img
दैनिक भ्रमर
नाशिक : भारत निवडणुक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणुका पारदर्शक, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन भारत निवडणुक आयोगाकडून मार्गदर्शक सुचना व आदेश वेळोवेळी निर्गमित केलेले आहेत. या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्हयात उमेदवार, राजकीय पक्ष यांचे निवडणुक खर्चावर संनियंत्रण, परिक्षण करणेकामी पुर्व तयारी करणेत येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.


भारत निवडणुक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रति उमेदवार 95 लक्ष रुपये इतकी कमाल खर्च मर्यादा निश्चित करणेत आलेली आहे. निवडणुका दरम्यान सदर खर्च मर्यादेचे पालन होण्याचे दृष्टीकोनातुन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिनांकापासुन विहीत नमुन्यात दैनंदिन निवडणुक खर्च संबंधित समन्वय अधिकारी यांचेकडे सादर करावा लागणार आहे.


निवडणुक कार्यक्रम दरम्यान गैरप्रकार रोखणेकामी विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी  6-स्थायी निगराणी पथके (Static Surveillance Team), 4-भरारी पथके (Flying Squad Team), 2-चलचित्र निगराणी पथके (Video Surveillance Team), 1-चलचित्र निरीक्षण पथक (Video Viewing Team) तैनात केली जाणार आहेत. ही पथके राजकीय सभा, रॅली यासारख्या प्रत्येक कार्यक्रमावर सुक्ष्म नजर ठेवणार असुन या प्रत्येक बाबीचे व्हिडीओ चित्रीकरण करणार आहेत. सदरच्या व्हिडीओ चित्रीकरणाची सि.डी. सर्वसामान्य नागरीकांना विहीत शुल्क अदा करुन उपलब्ध करुन दिल्या जातील.

सदर पथकातील कर्मचाऱ्यांचे आदेश जिल्हा निवडणुक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले असुन त्यांचे प्रशिक्षण 14 फेब्रुवारी रोजी महाकवी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे घेण्यात आले आहे.

भारत निवडणुक आयोगाकडून निवडणुकीतील उमेदवारांचे खर्चाचे परीक्षण करणेकामी भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणुक खर्च निरीक्षक म्हणुन केली जाते. सदर अधिकारी संपुर्ण निवडणुक कार्यक्रम कालावधीत पुर्णवेळ उपस्थित राहुन सर्व विधानसभा मतदार संघनिहाय दैनंदिन खर्चाकरीता नेमलेल्या समन्वय अधिकारी यांचेकडून आढावा घेणार आहेत. तसेच निवडणुक खर्चाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीची पडताळणी करणार आहेत.


मतदारांना निवडणुक खर्च वा अन्य निवडणुक विषयक तक्रारीकरीता मा.निवडणुक आयोगाने C-Vigil app उपलब्ध करुन दिले असुन त्याद्वारे मतदार ऑनलाईन पध्दतीने आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. सदर प्राप्त तक्रारीवर भरारी पथकाद्वारे त्वरीत योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.


एकंदरीत मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन नाशिक जिल्हा निवडणुक प्रशासनाने आवश्यक पुर्व तयारी पुर्ण केलेली असुन नागरीकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group