मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. असे असतानाच भाजप नेते आशिष देशमुख यांनी जरांगे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. एका वृत्त संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
मी राजकारणात जाणार नाही, निवडणूक लढवणार नाही, असे मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच सांगितले आहे. मात्र, गेल्या २ दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं.
यावेळी, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर, भाजपा नेत्यांकडून जरांगेंच्या विधानाचा निषेध नोंदवण्यात आला असून त्यांचा बोलवता धनी कोण?, असा सवालही विचारला जात आहे. त्यातच, आता भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतील, असा दावाच केला आहे
मनोज जरांगेंनी केलेला आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंची स्क्रीप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची असल्याचं वाटतं, असे म्हणत जरांगेंच्या पाठिशी कोण आहे, असा सवाल केला. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याचा आरोप होत आहे. त्यातच, आमदार आशिष देशमुख यांनी जरांगेच्या राजकीय प्रवेशाचा दावा
केल्याने एकच खळबळ उडाली आहे
काय म्हणाले आशिष देशमुख
"बीड लोकसभा मतदारसंघातून जरांगे यांना शरद पवार गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचा आंदोलन उभं केलं आणि एवढे महिने लांबवलं. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडची जागा मिळावी म्हणून पवार गटाचे प्रयत्न राहणार असणार आहे. ती जागा शरद पवार गटाला सुटल्यानंतर तिथे मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले. तसेच, आमदार राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, त्यांच्या आंदोलनास बीडमधून मोठा पाठिंबाही मिळाला. त्यामुळे, बीड जिल्ह्यातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा होत आहे.