नाशिक (नाना खैरनार) :- संपूर्ण जगात महिला दिन साजरा होत असताना नाशिकच्या महिला देखील मागे राहिल्या नाही. नाशिकच्या क्रिकेटपटू रसिका शिंदे, ईश्वरी सावकार आणि प्रियंका घोडके यांनी उंच भरारी घेतली आहे. थायलंडमध्ये होणार्या सराव सामन्यांसाठी या तिघा नाशिककर महिलांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली व त्या थायलंडकडे रवाना झाल्या.
थायलंडमध्ये महिला क्रिकेटचा विकास होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. यातीलच एक प्रयोग म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट संघाला सामने खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. संघातील काही निवडक वरिष्ठ खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले. त्यात रसिका शिंदे, ईश्वरी सावकार आणि प्रियंका घोडके या नाशिककर महिलांची वर्णी लागली.
रसिका शिंदे व प्रियंका घोडके या अष्टपैलू खेळाडू असून, ईश्वरी सावकार ही सलामीची तडाखेबंद फलंदाज आहे. या तिघीही नाशिककर महाराष्ट्राच्या संघात गेल्या काही वर्षापासून खेळत आहेत.
रसिका, ईश्वरी आणि प्रियंका या तिघीही थायलंडच्या 25 दिवसांच्या दौर्यावर असून, महाराष्ट्राचा संघ तेथे सराव सामने खेळणार आहे.
दरम्यान दुसर्या देशात जाऊन क्रिकेट खेळणारे नाशिकच्या बहुदा प्रथमच या तिघी असाव्यात. महिला दिन साजरा होत असताना नाशिककरांसाठी व नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंसाठी आनंदाची व सुखद बाब ठरली आहे.
त्यातून नाशिकच्या महिला क्रिकेटला नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. प्रियंका घोडके ही सिन्नर तालुक्यातील खेळाडू आहे.