सिटीलिंक बस वाहकांचा आज पुन्हा संप; नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
सिटीलिंक बस वाहकांचा आज पुन्हा संप; नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) : 7 मार्चपर्यंत थकीत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या बस वाहकांनी आज पुन्हा अचानक  बस बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सिटलिंकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. तपोवन डेपो येथील 50 तर नाशिकरोड येथील डेपोतून 20 बसेस बंद करण्यात आल्या असून यावर तातडीने निर्णय न घेतल्यास हा संप सुरू राहणार असल्याचे सिटी लिंक बस वाहकांनी कळविले आहे. 
 
सिटी लिंकच्या नाशकात दोन डेपो अंतर्गत सुमारे अडीचेशहून अधिक बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कामगारांचे वेतन हे डिसेंबर महिन्यापासून थकले असून काहींना अर्र्धे पेमेंट, काहींना थोड्याशा मुदतीवर आश्वासन देत पुन्हा कार्यरत करण्यात आले होते. या संदर्भात मागील महिन्यातच सिटीलिंकच्या बस वाहकांनी अचानक संप पुकारला होता. दहावी-बारावी परीक्षेच्या काळातच हा संप पुकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

 दरम्यान महापालिकेने मध्यस्थी करीत या कंत्राटदारांशी बोलून महानगरपालिकेने आगाऊ पेमेंट केले, मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काही वेतन दिले, तर काहींना न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन केले होते. 

दरम्यान सात मार्चपर्यंत सर्वांना वेतन दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप वेतन खात्यामध्ये जमा न झाल्याने आज (दि.14) सकाळी सिटी लिंकच्या वाहकांनी आंदोलनाची भूमिका घेत बसेस बंद केल्या. 

तपोवन डेपोतील दीडशे पैकी 50 तर नाशिकरोड येथील शंभर बसेस पैकी 20 बसेस बंद करण्यात आल्या असून हा संप त्वरित न मिटल्यास अन्य बसेसही बंद केल्या जाणार असल्याचा इशारा सिटी लिंकच्या वाहकांनी दिला आहे. आज सकाळी अचानक हा निर्णय घेतल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेल्या नेहमीचे विद्यार्थी, कंपनी कामगार, महिला तसेच नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

 नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत सिटी लिंक या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत.  या बसेस ठेकेदार पद्धतीने दिल्यामुळे त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे सिटीलिंक  तपोवन डेपो येथे दीडशे तर नाशिकरोड डेपोचे सुमारे 100 बसेस असून त्याद्वारे सुमारे 550  चालक वाहक आपली सेवा बजावत आहेत.  मागील संपामध्ये फक्त तपोवनातील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. नाशिकरोड येथील बससेवा सुरू  होती. मात्र यंदा यावेळी नाशिकरोड आणि तपोवन या दोन्ही डेपोतील वाहन चालकांनी बंद पुकारला असून त्वरित वेतन न मिळाल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सिटीलिंक वाहक युनियनचे संदीप गवळी यांनी सांगितले.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group