समाजकंटकाकडून 5 लाखांच्या टोमॅटो पिकाचे नुकसान; शेतकरी हवालदिल
नाशिकरोड (प्रतिनिधी):- काढावयास आलेल्या टोमॅटो पिकाच्या झाडांच्या तारा व बांबू नुकसान करण्याच्या हेतूने तोडून अज्ञात समाजकंटकाने सुमारे पाच लाखांचे नुकसान केले आहे.
सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी येथील सुखदेव भिमाजी गुंजाळ या शेतकऱ्याने गट नंबर 1065 मधील वीस गुंठे क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटो पिकाची लागवड केली.
टोमॅटोची लागवड करून झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत असलेल्या गुंजाळ यांनी खासगी टँकरद्वारे पाणी आणून पिकाला जीवदान दिले. सध्या टोमॅटोला चांगला भाव असल्याने झालेला खर्च आणि उत्पन्नाच्या विचारात असतानाच मध्यरात्री अज्ञात समाजकांटकाने टोमॅटोच्या झाडाला लावलेल्या बांबू व तारा तोडून या टोमॅटो पिकाचे नुकसान केले आहे.
आज पहाटे शेतकरी गुंजाळहे शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे. आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा व त्याला कठोर शासन करावे, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांसह शेतकऱ्याने केली. तलाठी कावळे व पोलीस पाटील सुरेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.