नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मनपा उद्यान विभागाची परवानगी न घेता तीन झाडे तोडून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनपाच्या पूर्व प्रभागाचे उद्यान निरीक्षक सचिन रामदास देवरे (रा. यश अपार्टमेंट, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
की संशयित श्री रवी महाजन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स या संस्थेने शासनाची व मनपाची कुठलीही परवानगी न घेता काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डनजवळ असलेल्या आनंदवन गोडेबाबानगर उद्यानाशेजारी असलेल्या एक आवळा, चाफा व पिंपळ या जातींचे वृक्ष जमिनीपासून पूर्णपणे तोडून नुकसान केले. हा प्रकार दि. 18 डिसेंबर 2023 रोजी घडला होता.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनापरवाना झाड तोडल्याप्रकरणी रवी महाजन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक सय्यद करीत आहेत.