नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :-
कंपनीचा माल विकून आलेली 15 लाख 61 हजार 542 रुपयांची रक्कम जमा करून घेत ती बँकेच्या कर्मचाऱ्याकडे भरण्यास न देता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी एका सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संदीप केदारनाथ सालपुरे (रा. वृंदावन कॉलनी, बळी मंदिराजवळ, पंचवटी) हे महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड या कंपनीचे कामकाज पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी नीलेश दिलीप कुमावत (वय 25, रा. स्प्रिंग व्हॅली, बोधलेनगर, उपनगर) हा महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीत सुपरवायझर या पदावर नोकरी करीत होता.
त्या दरम्यान कुमावत याने महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीचा माल विकून आलेली 15 लाख 61 हजार 542 रुपयांची रोख रक्कम जमा करून घेतली; मात्र ही रक्कम एअरटेल बँकेच्या कर्मचाऱ्याकडे भरण्यास न देता स्वत:कडे ठेवून या रकमेचा अपहार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई येथील पीएसएल सप्लाय चैन सोल्यूशन्स प्रा. लि. येथे घडला. अपहाराची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी सालपुरे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आरोपी नीलेश कुमावत याच्याविरुद्ध तक्रार दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.