राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका आणि रॅलींचा धडाका सुरू झाला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज चंद्रपुर येथे प्रचार सभा घेतली.
यावेळी त्यांनी एक खळबळजन विधान केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काही कार्यकर्त्यांनी आपल्याला चंद्रपूपर येथे प्रचाराला येऊ नका, असे सांगितले. कारण भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून ओबीसी समाजाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर रिंगणात आहेत.
यावेळी भुजबळ म्हणाले, "मुनगंटीवार यांच्या विरोधातील उमेदवार ओबीसी आहे. त्यामुळे प्रचाराला येऊ नका, असा फोन मला चंद्रपूरच्या ओबीसी कार्यकर्त्यांनी केले. मात्र याला मी जुमानले नाही. कारण जेव्हा ओबीसींच्या आरक्षण धोक्यात आले तेव्हा धानोरकर यांनी काहीही भूमिका घेतली नव्हती. महायुती सरकारने ओबीसींचे आरक्षण टिकवले आणि मराठा समाजाला दहा टक्के विशेष आरक्षण दिले. हे त्यांचे काम उल्लेखनीय आहे त्याची दखल घेतलीच पाहिजे.
भुजबळ म्हणाले, "मला सांगायचे आहे की, ओबीसी प्रश्नावर चंद्रपूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या आमदारांनी कोणतीही भूमिका का घेतली नाही. ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले होते. ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला त्यावेळी ओबीसींची घरे जाळली गेली. हल्ले करण्यात आले. पोलिसांवर हल्ले झाले.
त्यावेळी धानोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षाने कुठलीही भूमिका घेतली नाही. ते ओबीसींच्या पाठीमागे उभे राहिले नाहीत. त्यांनी साधा निषेध देखील व्यक्त केला नाही हे समजून घेतले पाहिजे."
दरम्यान भुजबळ यांनी या सभेत ओबीसींचा मुद्दा मांडला. "मात्र जात पाहून मतदान करू नका. विकासासाठी मतदान करा," असे सांगायलाही ते विसरले नाहीत. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उमेदवार, वांमंत्री आणि उमेदवार सुधीर मुनगंटीवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, डॉ भूषण कर्डिले, ईश्वर बाळबुधे, हरिष शर्मा, प्रकाश देवतळे, नितीन भटारकर यांचा विविध नेते उपस्थित होते.