ठाणे : माळशेज घाटात अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. माळशेज घाटा जवळील आवळ्याची वाडी (ता.मुरबाड जि.ठाणे) येथे नगर-कल्याण महामार्गावर दुधाचा ट्रँकर व टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.
या अपघाताबाबतची माहिती टोकवडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर चकोर व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बदे यांनी दिली. या अपघाता अक्षय शांताराम दिघे (वय 33) व तेजल अक्षय दिघे (वय 26 रा.पांगरी, ता. मढ) व टँकर चालक दत्तात्रय किसन वामन (रा.पिपळवंडी) हे जागीच ठार झाले असून 407 टेम्पो चालक शकील अमजत शेख (रा.बादशाह तलाव,जुन्नर) हा उपचारा दरम्यान मयत झाला आहे.
या अपघातात आरूष अक्षय दिघे (वय 3) हा जखमी असून आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. या अपघाताबाबत निसार लतीफ पठाण यांनी टोकवडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस हवालदार रमेश गंगावणे व पाडुरंग बगाड यांनी माहिती दिली की दिघे दामंपत्य नातेवाईकाच्या लग्नानिमित्त गावी आले होते ते काल दुपारी परत मुंबईला दुधाच्या टँकरमध्ये माळशेज मार्गे कल्याणला जात असताना कल्याण बाजू कडून जुन्नर बाजूला येत असलेल्या मालवाहू 407 टेम्पोची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली.
ही धडक एवढी भिषण होती की या अपघातात टँकर रस्त्याच्या खाली उतरून टँकरवरील दुधाची टाकीही तुटून बाजूला पडली. तर मालवाहू टेम्पोचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात दिघे दामंपत्य जागीच ठार झाले. तसेच टँकर चालक ही जागीच ठार झाला. सुदैवाने तीन वर्षाचा आरूष वाचला. तर 407 चा टेम्पो चालक हा गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाला. पुढील तपास टोकवडे पोलीस करत आहे.