नाशिकमध्ये 28 किलो गांजा जप्त
नाशिकमध्ये 28 किलो गांजा जप्त
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- गुन्हे शाखा युनिट एकने वडाळागावातील एका घरावर छापा टाकून २८ किलो गांजा जप्त केला आहे. वडाळागावातून नाशिकमध्ये गांजाची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

शाहरुख शहा रफिक शहा (वय २९, रा. ए-८, म्हाडा वसाहत बिल्डिंग, वडाळागाव, मूळ रा. मेहबूबनगर, नाशिक) असे गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. युनिट एकचे अंमलदार मुख्तार शेख यांना शहा याच्या घरात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे व युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या निर्देशानुसार पथकाने काल सायंकाळी पाच वाजता शहा याच्या घरात छापा टाकल.

त्यावेळी पथकाच्या हाती सव्वाचार लाख रुपयांचा ओलसर गांजा हाती लागला. या गांजासह एक मोबाईल असा ४ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहा याला ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास उपनिरीक्षक बी. डी. सोनार करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group