नाशिक (प्रतिनिधी) :- अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये वीज गायब असल्यामुळे याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या उद्योजकांना अधिकारीच जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त उद्योजकांनी विद्युत मंडळाच्या केंद्राबाहेर पायरीवर बसून आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता धावत या ठिकाणी गेले आणि त्यांनी पुढील काही वेळात वीज सुरू करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे उद्योजकांनी आपले आंदोलन हे मागे घेतले आहे.
नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीला कालपासून विद्युत मंडळाच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला आहे, तसेच आजदेखील सकाळी वीज गायब झाल्यामुळे याबाबतची विचारणा करण्यासाठी आयमा व निमाचे पदाधिकारी हे अंबड औद्योगिक वसाहतीतील सबस्टेशन येथे गेले होते. त्या ठिकाणी फक्त ऑपरेटरच होते. या ऑपरेटरकडून उद्योजकांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या ठिकाणी अधिकारी आहेत का, असे विचारले असतानादेखील अधिकारी नाही, असे सांगून ऑपरेटरने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु कामकाज कसे होते, असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला, जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही, अशी भूमिका घेत माजी अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र पानसरे, रवींद्र झोपे, कुंदन दिरंगे व अन्य उद्योजकांनी 132 केव्हीच्या सबस्टेशनबाहेर पायरीवर बसून आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतर उद्योजक आपल्या कामगारांसह त्या ठिकाणी पोहोचले; परंतु विद्युत मंडळाचे अधिकारी नसल्याने उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलनाची माहिती तातडीने विद्युत मंडळाचे अधिकाऱ्यांना मिळाल्यावर अंबडचे कार्यकारी अभियंता तातडीने सबस्टेशनमध्ये दाखल झाले व त्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वारसन दिले. त्यानंतर उद्योजकांनी आपले आंदोलन हे थांबविले.
विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. एखाद्या वेळेस असा प्रसंग उद्भवला, तर तो एकवेळ समजला जाऊ शकतो; परंतु सातत्याने असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली.