Nashik Crime : द्राक्ष उत्पादकाची 22 लाख रुपयांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
Nashik Crime : द्राक्ष उत्पादकाची 22 लाख रुपयांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
img
Prashant Nirantar


नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- दुबई येथे पाठविलेल्या चार कंटेनर द्राक्षांची विक्री करून त्यातून मिळालेले पैसे परत न करता द्राक्ष उत्पादकाची सुमारे 22 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी योगेश रमण गोर्‍हे (वय 51) हे राजसारथी सोसायटीच्या मागे, इंदिरानगर येथे राहतात. त्यांची चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे शेती आहे. या शेतीमध्ये ते द्राक्षाचे उत्पादन घेतात. ही द्राक्षे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:च्या श्री स्वामी अ‍ॅग्रो प्रो. प्रा. कंपनीच्या माध्यमातून विदेशात पाठवितात. त्यांच्या ओळखीचे आंतरराष्ट्रीय मार्केट एजंट म्हणून काम करणारे नितीन नरेश तनीर (रा. बोरिवली पश्‍चिम, मुंबई-92) यांना द्राक्ष विक्री करण्यासाठी सांगितले.

त्यानुसार तनीर याने त्याच्या ओळखीचे बापू निंबोरे (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याची ओळख करून दिली. निंबोरे हे आंतरराष्ट्रीय फ्रूट मार्केट एजंट असल्याने त्यांनी मिडव्हिला ड्राय फ्रूट स्टफ टुडिंग कंपनीचे मालक गंगाराम सुकदेवराव चव्हाण यांना द्राक्ष विक्रीबाबत सांगितले. त्यानंतर या सर्वांनी फिर्यादी गोर्‍हे यांची झूम मीटिंग घेतली. त्यावेळी भांडूप येथे असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन खात्री केल्यानंतर गोर्‍हे यांनी द्राक्षाचा चार कंटेनर माल दुबई येथे पाठविला होता. त्यावेळी दि. 8 एप्रिल 2023 रोजी गोर्‍हे यांच्या बँक खात्यात अ‍ॅडव्हान्स म्हणून पाच हजार डॉलर, 11 एप्रिल 2023 रोजी हजार डॉलर, दि. 18 एप्रिल 2023 रोजी चार हजार, चार हजार डॉलर असे एकूण 10 हजार यूएस डॉलर अ‍ॅडव्हान्स म्हणून गोर्‍हे यांना दिले होते. दि. 14 एप्रिल 2023 रोजी फिर्यादी गोर्‍हे आणि नितीन तनीर हे दोघे जण द्राक्षविक्रीसंदर्भात दुबई येथे गेले होते.

त्यावेळी तनीर याच्या ओळखीने आरोपी गंगाराम चव्हाण याच्याशी ओळख करून दिली. त्यावेळी चार कंटेनर द्राक्ष पाठविली होती. त्याचे वजन सुमारे 53 टन होते. त्याचे बिल कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी व द्राक्ष माल मार्केटमध्ये आणण्यासाठी सर्व कागदपत्रे दिली. त्यानंतर आरोपी चव्हाण यांनी हा सर्व माल आंतरराष्ट्रीय बाजारात 54 हजार 862 यूएस डॉलरमध्ये विक्री करण्यात आला; मात्र मिडव्हिला स्टार फ्रूट स्टफ टुडिंग कंपनीचे मालक गंगाराम चव्हाण यांनी विक्री केलेल्या मालाचे पैसे आठ दिवसांत देतो, असे सांगितले; मात्र गोर्‍हे यांना दोन कंटेनर मालाचे 18 हजार 525 यूएस डॉलर यांच्या बँक खात्यावर पाठवून त्यातील कमिशनपोटी 2 हजार 759 डॉलरची कपात करून घेतली.

या व्यवहारात आरोपी गंगाराम चव्हाण यांनी दोन कंटेनरची रक्कम 26 हजार 327 यूएस डॉलर भारतीय चलनाप्रमाणे 21 लाख 96 हजार 506 रुपये परत करण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत फिर्यादी यांनी आरोपी गंगाराम चव्हाण, नितीन तनीर व बापू निंबोरे यांनी संगनमत करून फसवणूक केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group