नाशिक - "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया", "पुढच्या वर्षी लवकर या"च्या गजरात नाशिक मध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये एकूण 22 चित्ररथ सहभागी झालेले आहेत.
मागील दहा दिवसांपासून घरोघरी तसेच सार्वजनिक मित्र मंडळांमध्ये विराजमान असलेले श्री गणराय यांना आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. नाशिकमध्ये सकाळी 11.30 वाजताच मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील वाकडी बारव या ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
मानाचा पहिला गणपती असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या चित्ररथासमोर दादा भुसे यांनी श्रीफळ फोडले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख आणि महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, गजानन शेलार, रामसिंग बावरी, अरुण पवार, नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, सतीश आमले, पवन भगूरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीमध्ये गुलालवाडी व्यायाम शाळेची लेझीम पथक यासह विविध ढोल पथक हे आकर्षण ठरत आहे. वेधशाळेने आज दुपारनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.