गुंगीचे औषध पाजून भोंदू बाबाने केला तरुण विवाहितेवर अत्याचार
गुंगीचे औषध पाजून भोंदू बाबाने केला तरुण विवाहितेवर अत्याचार
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :  भूतबाधेवर इलाज करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही 19 वर्षीय असून, ती पती, सासू, सासरे, नणंद, दीर यांच्यासह एकत्र कुटुंबात राहते. या विवाहितेला लग्नानंतर काही दिवसांनी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिने माहेरी व सासरी बरेच औषधोपचार केले; मात्र फरक पडेना. त्यामुळे पीडितेवर कोणी जादूटोणा किंवा भूतबाधा केल्याचा समज झाला. म्हणून पीडितेच्या सासर्‍याने व एका नातेवाईकाने वडाळा गावातील मेहबूबनगर येथे राहणारा एक भोंदू बाबा यावर इलाज करतो, असे सांगितल्यामुळे पीडितेची सासू व नणंद यांनी पीडितेला त्या भोंदू बाबाकडे इलाजासाठी नेले.

बाबाने तिला सांगितले, की तुला एका व्यक्तीने हळदीमध्ये काही तरी खाऊ घातले आहे. त्यामुळे तुझ्या अंगात एक माणूस व दोन महिलांचे भूत आहे. त्यावर इलाज करावा लागेल आणि त्यासाठी साडेपाच हजार रुपये खर्च लागेल. त्यानंतर दुसर्‍या दिवशी बाबाने सांगितल्याप्रमाणे सासू व नणंंदेसह पीडिता बाबाच्या घरी गेली. त्याने काही तरी मंत्र उच्चारून विभूती टाकली व परत दोन दिवसांत यायला लावले.

त्यानंतर पुन्हा बाबांकडे गेले. त्यानंतर काही दिवसांनी विभूती देऊन ती चाखायला सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी हा भोंदू बाबा तिच्यावर इलाज करण्यासाठी पीडितेच्या घरी आला व या बाबाने घरातील सर्व सदस्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले.

त्यानंतर घरात फक्त पीडिता व भोंदू बाबा असे दोघेच होते. त्यानंतर या भोंदू बाबाने तिला इलाज करण्याच्या बहाण्याने काही तरी गुंगीकारक औषध फुंकारले. त्यानंतर भोंदू बाबाने तिच्याशी जबरदस्ती लैंगिक अत्याचार सुरू केले. ती शुद्धीवर येताच त्याला विरोध केला असता या भोंदू बाबाने ही बाब कोणाला सांगितली, तर तुझ्या पूर्ण परिवाराला मारून टाकीन, असा दम दिला.

त्यामुळे भेदरलेल्या पीडितेने ही बाब कुटुंबीयांना सांगितली नाही; मात्र नाईलाजाने ही गोष्ट घरी सांगावी लागली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून भोंदू बाबा अमिन हुसेन यासिम शेख (रा. मेहमूदनगर, वडाळा गाव, नाशिक) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group