सातपूर : येथील प्रबुध्दनगर येथे राहणाऱ्या एका 13 वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अर्जुन पाईकराव हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांसमवेत येथे राहतात. काही कामानिमित्त ते आपल्या दोन्ही मुलांना नाशिकमध्ये ठेऊन संभाजीनगरला गेले होते. त्यांचा लहान मुलगा अनिकेत हा त्यांच्यासोबत जाण्यासाठी हट्ट धरत होता. मात्र, ते दोघेच निघून गेले. अनिकेतचा मोठा भाऊ शाळेत गेला असता, घरी एकटा असताना अनिकेतने गळफास घेऊन त्याचे जीवन संपविले.
लहान मुलांचे आत्महत्या करण्याच्या अनेक घटना सध्या ऐकू येतात, वाचण्यात येतात. एवढ्या लहान वयात मुलांना हे सुचते तरी कसे असा प्रश्न अनेकवेळा उपस्थित होत असतो. टीव्ही व मोबाईल चा हा परिणाम असल्याचे अनेक जण सांगतात.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बेंडकुळे करीत आहेत.