अवैध सावकाराच्या घरावर धाड सिडकोतून धनादेश, महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत
अवैध सावकाराच्या घरावर धाड सिडकोतून धनादेश, महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- शहरातील सिडको परिसरात उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने अवैध सावकारी करणार्‍या व्यक्तीच्या घरावर धाड टाकून कोरे व तारीख नसलेले धनादेश, घराची व जमिनीची कागदपत्रे जप्त केली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शैलेश अरविंद पोतदार (रा. उदयनगर, मखमलाबाद, पंचवटी) हे उपनिबंधक सहकारी संस्था येथे सहकार अधिकारी म्हणून काम पाहतात. तक्रारदार संजय तुळशीराम मते (रा. मुरंबी, ता. इगतपुरी) यांना लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी आरोपी खासगी सावकार नाना रामचंद्र कोकणे (रा. रजत पार्क, डीजीपीनगर, वनश्री कॉलनी, अंबड) याने मते यांना रोख रक्कम दिली.

त्यापोटी मौजे मुरंबी येथील जमिनीचे साठेखत करून घेतले होते. कोकणे याच्याविरुद्ध याच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत मते यांनी मागणी केली होती. त्यानुसार उपनिबंधक सहकार संस्थेच्या पथकाने नाना कोकणे यांच्या घरी धाड टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पथक तयार करून पथकाला धाड टाकण्यासाठी आदेशित केले. त्यानुसार दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्यादी सहकार अधिकारी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली. पथकाने कोकणे यांच्यावरील कार्यवाही पूर्ण करून कार्यालयास अहवाल सादर केला.

पथकाने खासगी सावकार नाना कोकणे याच्या राहत्या घरी व अंबड एम. आय. डी. सी. तील जय मल्हार हॉटेल या व्यवसायाच्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैध सावकारीच्या व्यवहाराच्या संबंधाने आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. तक्रारदार संजय मते यांनी तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या मुलाने समर्थ सहकारी बँकेकडील रवींद्र मते यांना दिलेले शिवराज्य अ‍ॅग्रो फर्मच्या 21 हजार रुपये बँकेची भरणा पावती घरझडतीत आढळून आली आहे, तसेच अनेक लोकांना हातउसनवार रक्कम कागदोपत्री देऊन त्याच्या पावत्या, तसेच कोरे चेक जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहेत.

खासगी सावकार पथकाने जप्त केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच साईनाथ इंजिनिअर्स, तसेच बीएम इंजिनिअरिंग यांसारख्या विविध व्यावसायिकांना दिलेल्या अवैध कर्जापोटी त्यांच्याकडून घेतलेले कोरे चेक धाडीच्या वेळी पथकाला आढळून आले आहेत. दरम्यान, कोकणे याने हातउसनवार लग्नासाठी रोख रक्कम दिली होती. त्यापोटी मौजे मुरंबी (ता. इगतपुरी) येथील जमिनीचे साठेखत करून घेतल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली. या प्रकरणी खासगी सावकार नाना कोकणे याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group