Majhi Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद
Majhi Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद
img
दैनिक भ्रमर
या संवाद सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींशीही संवाद साधला. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह दोन्ही योजनांच्या लाभार्थी उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती खैरनार, ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या लाभार्थी तेजस्विनी कुलथे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती सुनील खैरनार (रा. नांदगाव, ता. नांदगाव) यांनी १७ जुलै रोजी योजनेचा अर्ज स्वत: भरला होता. महिनाभराच्या आतच त्यांच्या बँक खात्यावर काल दुपारी रुपये तीन हजार रक्कम झाल्याचे जमा सांगून आपल्याला ही रक्षाबंधनची ओवाळणी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या घरी पती, सासू, सासरे व २ छोटी अपत्ये आहेत.

त्यांचे पती कापड दुकानात काम करतात. सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या पगारात भागविताना तारेवरची कसरत व्हायची. कुटुंबाला हातभार म्हणून त्या स्वत: अस्मिता ग्राम संघाच्या सदस्या झाल्या असून, बाजरी प्री मिक्स करण्याचे काम त्या करतात. या पैशांतून संसारासाठी आर्थिक मदत होणार असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती अरुण महाजन (रा. गिरणानगर, ता. नांदगाव) यांनी बँक खात्यावर ३ दिवसांपूर्वी रक्कम जमा झाल्याचे सांगून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. कुटुंबात त्यांच्यासह पती, सासू व दहावी पास मुलगा हे सदस्य आहेत.

त्यांचे पती खासगी वाहनचालक आहेत. त्या स्वतः उम्मेद अभियानच्या सी आर पी आहेत. त्यांनी १५ जुलै रोजी स्वत: या योजनेचा अर्ज भरला होता. स्वतः अर्ज भरण्याबरोबरच त्यांनी इतर महिलांनाही प्रेरित केले. त्यांचा मुलगा आय. टी. आय. ला प्रवेश घेत असून त्याच्या प्रवेशासाठी या रकमेचा विनियोग करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 

या दोन्ही लाभार्थींनी मुख्यमंत्रीरूपी भाऊ आपल्या पाठिशी असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

तेजस्विनी नंदकुमार कुलथे (रा. नाशिक) ही पदवीधर युवती नोकरीच्या शोधात असताना अनुभवाअभावी तिचे प्रयत्न अपुरे पडत होते. मात्र, तिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. तिने नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.

त्यासाठी तिला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. यामुळे तिला आर्थिक मदतीसह शासकीय कार्यालयातील कामकाजाचा अनुभव मिळणार असून, भविष्यातील नोकरीसाठी या अनुभवाची मदत होणार असल्याचे सांगून तिने राज्य शासनाचे आभार मानले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group