नाशिकचा साहिल पारख भारतीय संघात
नाशिकचा साहिल पारख भारतीय संघात
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकचा डावखुरा धडाकेबाज फलंदाज साहिल गोकुळ पारख याची 19 वर्षे आतील भारतीय संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही निवड झाली आहे. साहिलच्या या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट जगतात उत्साहाचे वातावरण आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात साहिल दोन चार दिवसीय सामने आणि तीन एक दिवसीय सामने खेळणार आहे. दि. 21 सप्टेंबरपासून तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साहिल क्रिकेट खेळत आहे. 14 वर्षांतील, सोळा वर्षांतील व 19 वर्षांतील महाराष्ट्राच्या संघात देखील तो खेळला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून त्याचा खेळ उंचावत गेला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने तडाखेबंद फलंदाजी करून महाराष्ट्रासह देशाचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत केले होते. साहिल हा नाशिक क्रिकेट ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून त्याच्या निवडीबद्दल नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शाह, सचिव समीर रकटे, नाशिक क्रिकेट अकॅडमीचे संचालक मकरंद ओक व प्रशिक्षक अमित पाटील व श्रीरंग कापसे यांनी अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकचा एक तरी खेळाडू भारतीय संघात जावा यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन खेळाडूंवर मेहनत घेत होते. आज ते स्वप्न साकार झाल्याचा आनंद नाशिक जिल्हा असोसिएशन व साहिलच्या पालकांना झाला आहे. यातून नाशिकचे खेळाडू निश्चितच प्रेरणा घेतील. उद्योजक चंद्रकांत पारख यांचा साहिल हा नातू आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group