३० ऑगस्ट २०२४
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- भगूर शहरातील शितळादेवी चौकात मराठी मुलींच्या शाळेजवळ आज पहाटेच्या सुमारास एक मातीचे घर कोसळल्याची दुर्घटना घडली असून यात तिघेजण अडकले होते; मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, भगूर नगरपालिकेने धोकादायक वाडे व घरांबाबत सुमारे 200 ते 250 लोकांना नोटिसाही बजावल्या होत्या; मात्र याकडे घरमालकांनी दुर्लक्ष केल्याने अशी दुर्घटना घडल्याची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा ढाकणे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शितळादेवी चौकातील सुनील एकनाथ कस्तुरे यांचे धोकादायक मातीचे व कौलारू घर कोसळले. पहाटेच्या सुमारास 5.45 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यावेळी घरात सुनील कस्तुरे तसेच यांच्या पत्नी आणि मुलगा झोपलेले असल्याने ते तिघे जण घरात अडकले होते; मात्र ही दुर्घटना घडल्यानंतर कसे तरी दोघेजण बाहेर पळाले. मात्र सुनील कस्तुरे हे घरातच अडकले होते. घर कोसळताना मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक व शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनी प्रसंगावधान राखून कस्तुरे यांना घराबाहेर काढले, त्यांना फारशी इजा झाली नाही.
दरम्यान भगूर न.पा.ने धोकादायक वाडे व घरासंदर्भात सुमारे दोनशे ते अडीचशे जणांना मे महिन्यातच नोटिसा पाठविल्या होत्या, असे नगरपालिकेच्या सीओ सुवर्णा ढाकणे यांनी सांगितले. तसेच या संदर्भात चौकांमध्ये बॅनर देखील लावले असून वृत्तपत्रात देखील याची जाहिरात देण्यात आली होती; मात्र संबंधित लोकांनी याकडे दुर्लक्ष केले. नोटिसा बजावूनही नागरिक अशा धोकादायक घरात राहत असल्याने आता यासंदर्भात त्यांचे विजेचे व पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात बंद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या कोलते वाड्यात देखील अशी दुर्घटना घडू शकते, या ठिकाणी तीन कुटुंब राहत असून, त्यांना या संदर्भात पुन्हा एकदा न.पा.कडून कळविण्यात येणार असून याबाबत पोलिसांचीदेखील मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Copyright ©2025 Bhramar