देवळा : प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. रविवार (दि .१) रोजी दुपारी साडे चार वाजेच्या वाजता सटाणा आगारातून निघालेल्या सुरत अहमदनगर बस क्रमांक एम एच 14 के ए 9845 या बसचे चाक निखळून पडल्याने ती देवळा नाशिक रस्त्यावर नादुरुस्त झाली. यामुळे सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सातत्याने बंद होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
रविवार (दि .१) रोजी अहमदनगर आगाराची बस क्रमांक एम एच14 के ए 9845 ही बस नाशिक च्या दिशेने जात असताना देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्या नजीक मागचे एक चाक निखळून पडले .बस चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला. विंचूर-प्रकाशा या महामार्गाची देवळा ते भावडबारी घाट दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.
या महामार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने रस्त्यावर वाहने चालवणे वाहनधारकांना जिकिरीचे झाले आहे . तर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाच्या दिवसांत याठिकाणी वारंवार छोटे छोटे अपघात घडत असून वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रवाशांच्या जीवाशी चालू असलेला खेळ अजून किती दिवस सुरू राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या रस्त्यावर सद्या एकेरी वाहतूक सुरू असून,देवळा ते रामेश्वर पर्यंत रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाली आहे.सदर बस चे चाक खराब रस्त्या अभावी निखळून पडल्याचे बोलले जाते .या बस मध्ये प्रवाशी होते. चालकाच्या प्रसंगावधानाणे पुढील अनर्थ टळला. मात्र एसटी महामंडळाच्या अनेक बस जुन्या असल्याने वारंवार रस्त्यांवर नादुरुस्त अवस्थेत आढळून येतात.यामुळे प्रवाशांना एन सणासुदीच्या दिवसात मनस्ताप सहन करावा लागतो आहे