२१ ऑगस्ट २०२४
नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- ॲग्रो सर्व्हिसेस कंपनीकरिता लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी प्रोसेसिंग फी व बँकेच्या विविध कामांकरिता सुमारे साडेनऊ लाख रुपये घेऊन एका व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अमोल अशोक गोऱ्हे (वय 43, रा. भक्तिधाम अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक) हे व्यापारी आहेत. त्यांचे शरणपूर रोडवरील सुयोजित हाईट्स येथे ग्रीन फिल्ड ॲग्रो सर्व्हिसेस नावाचे दुकान आहे. दुकानातील ॲग्रो व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ही रक्कम बँकेतून कर्ज काढून उपलब्ध करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी कर्ज काढून देणाऱ्या एजंटची चौकशी केली असता आरोपी जितेंद्र श्रावण चव्हाण हा बँकेतून लोन मंजूर करून देण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार फिर्यादी गोऱ्हे यांनी आरोपी जितेंद्र चव्हाण याच्या इंदिरानगर येथील सुदर्शन लॉन्सजवळील कार्यालयात जाऊन आरोपी चव्हाण याची 22 डिसेंबर 2023 रोजी भेट घेतली. त्याबाबत फिर्यादी गोऱ्हे यांनी एक ते दीड कोटी रुपये कर्ज हवे असल्याचे आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार गोऱ्हे यांनी कर्जप्रकरणासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आरोपीला दिली.
त्यानुसार आरोपी चव्हाण याने कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. 3 जानेवारी 2024 रोजी आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधून लोन मंजूर करण्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, तसेच इतर कामांसाठी लागणाऱ्या पैशांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी गोऱ्हे यांना चव्हाण याच्या डीबीएस बँकेतील खात्यावर 1 लाख 50 हजार रुपये जमा केले. त्यानंतर 18 जानेवारी 2024 रोजी चव्हाण याने लोन मंजूर करण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली.
त्यानुसार फिर्यादी गोऱ्हे याने पुन्हा आरोपी चव्हाण याच्या डीबीएस बँकेतील खात्यावर तीन लाख रुपये जमा केले. आरोपी चव्हाण याला लोन मंजूर करण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये घेऊनही त्याने लोन मंजूर करून दिले नाही. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने ग्रीन फिल्ड ॲग्रो कंपनीच्या अकाऊंटवर आरटीजीएसद्वारे 50 हजार रुपये पाठवून दिशाभूल केली. अशा प्रकारे वारंवार दिशाभूल करून आरोपी चव्हाण याने कर्ज मंजूर करून न देता सुमारे 9 लाख 60 हजार रुपये स्वीकारून फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar