नाशिक : आदिवासिंच्या 17 वर्गामध्ये पेसा पदभरती कृती समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळपासून आदिवासी विकास भवन समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. दरम्यान पेठ, हरसुल, या भागात काही ठिकाणी सुरू असलेले रस्ता रोको आंदोलन हे तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे.
मागील आठवड्यामध्ये आदिवासी समाजातील विविध विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेसा अंतर्गत कायम करण्याची मागणी करण्यासाठी म्हणून गोल क्लब मैदानावरती आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन सरकार निर्णय घेईल असे आश्वासन देऊन स्थगित करण्यात आले होते परंतु त्यानंतर कोणताही निर्णय न झाल्यानंतर मागील तीन दिवसापासून जिल्ह्यातील पेठ सुरगाणा इगतपुरी व इतर आदिवासी क्षेत्रांमध्ये या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले होते , हे चक्काजाम आंदोलन लागोपाठ तिसऱ्या दिवशी देखील पेठ व हरसुल व लगतच्या परिसरामध्ये सुरू आहे.तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असल्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे.
दरम्यान शुक्रवारपासून कॉम्रेड नेते आणि माजी आमदार जेपी गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित ,आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित, यांच्यासह शेकडो विद्यार्थी तसेच पेसा अंतर्गत काम करणारे कामगार यांनी सकाळी 11 वाजेपासून आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयासमोर गडकरी चौक ते त्रंबक नाका या रस्त्यावरती बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
यापैकी गावित मधुकर गावित आणि चिंतामण गावित हे तिघेही आदिवासी विकास भवन समोर उपोषणाला बसले आहे तर अन्य कार्यकर्ते आणि कामगार तसेच विद्यार्थी हे सर्वजण गोल क्लब मैदान येथे आंदोलन करीत आहेत , आदिवासी 17 सवर्गात पेक्षा पदभरती कृती समितीने देखील या बेमुदत बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे यामध्ये अजून काही कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.