नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या गाड्या अडवून त्यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. यावेळी या दोन्हीही नेत्यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
नाशिकमध्ये आज प्रदेश काँग्रेसच्या वतीने विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्यामुळे या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते. ज्यावेळी कार्यक्रम स्थळी त्या दोन्हीही नेत्यांचे आगमन झाले त्यावेळी या नेत्यांना सकल मराठा समाजाचे समन्वयक व छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाच्या बाहेर त्यांना अडवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यावर तुमची भूमिका काय यासाठी म्हणून ताफा अडवून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावर विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आमच्या पक्षाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे आणि मी विधानसभेमध्ये ती स्पष्ट केलेली आहे. ज्यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा ताफा आला त्यावेळी देखील त्यांना घेराव घालण्यात आला. त्यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, माझा पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आजही आग्रह आहे, उद्या पण राहणार आहे. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.