मोठी बातमी : काँग्रेसच्या
मोठी बातमी : काँग्रेसच्या "या" बड्या आमदाराचा राजीनामा ; भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेले काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. ते आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. या आमदारांची नेमकी नावं समोर आली नव्हती. मात्र, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता. जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती. 

काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले होते. 

मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ते आज दुपारी दोन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.  जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याच्या भीतीने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी राजकारणातील हा धोका लक्षात घेऊनच जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group