ठाणे : अश्लील फोटो काढून एका तरुणीला सतत ब्लॅकमेल करणे एका बिल्डरच्या मुलाला चांगलंच भोवलं आहे. २० वर्षीय पीडित तरुणीला बिल्डरच्या मुलगा सतत ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे तिच्या मित्राने त्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हत्या झालेला तरुण हा एका बिल्डरचा मलुगा असून त्याचं नाव स्वयम शैलेश परांजपे असं आहे. या गुन्ह्यात आरोपीला प्रेयसीनेच मदत केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वयम हा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत होता. तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देत होता. यामुळे त्रासलेल्या त्याच्या प्रेयसीने तिच्या प्रियकरासह मिळून स्वयमचं घर गाठलं. दोघांनी त्याच्यावर कोयत्यानं आणि कटरने वार केले. जवळपास ५० वार करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
मयुरेश नंदू धुमाळ असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. स्वयमवर वार केल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हत्येनंतर तरुणी आणि तिचा प्रियकर इमारतीच्या खाली आले. तिथे ते १० मिनिटं शांतपणे बसले होते. तिथं त्यांनी सिगारटचे झुरके घेत पोलीस येण्याची वाट पाहिली. तर आरोपीचे वडील हे पोलीस सेवेत असल्याची माहिती समोर आलीय..
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही आरोपी स्वत: पोलिसांसमोर शरण गेले. ते पोलिसांच्या गाडीत बसले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. आरोपी धुमाळ हा जांभळी नाका आणि त्याची प्रेयसी चेंदणी कोळीवाडा इथं राहत असल्याची माहिती समजते.
स्वयम ब्लॅकमेल करत असल्याचं तरुणीने तिचा नवा प्रियकर मयुरेश धुमाळला सांगितलं. यानंतर स्वयमला संपवायचं असं ठरवूनच दोघेही त्याचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वयमला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नव्हता. शेवटी शुक्रवारी सकाळी मयुरेश स्वयमच्या घरी गेला आणि तिथंच त्याची हत्या केली.