मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरच्या अंगावर शाईफेक करण्यात आली आहे. आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांचा निषेध करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरच्या अंगावर शाई टाकण्यात आली आहे. नाशिकच्या सिडको भागामध्ये हा प्रकार घडला आहे. जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट या डॉक्टरने केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये जावून शाईफेक केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर डॉक्टर विजय गवळी यांनी मी सुद्धा मराठा असं म्हटलं. संभाजी ब्रिगेडने केलेल्या शाईफेकीनंतर डॉक्टर विजय गवळी यांनी माफी मागितली आहे.
‘मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझ्याकडून नकळत चुकून एक व्हिडिओ पोस्ट झाला होता. माझ्याकडून हा व्हिडिओ नकळत आणि चुकून फॉरवर्ड झाला. मी स्वत: मराठ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. माझ्याकडून जरांगे पाटलांचा अवमान करणारी पोस्ट चुकून पाठवली गेली आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’, असं डॉक्टर विजय गवळी म्हणाले आहेत.
डॉक्टरने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
संबंधित डॉक्टराकडून वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टराचं क्लिनिक गाठत त्याच्या तोंडावर शाईफेक केली. यावेळी आंदोलकांनी डॉक्टराच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला. जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट डॉक्टराने केली होती. या पोस्टमुळे चिडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी सिडको येथील विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्या अंगावर शाईफेक केली.
दरम्यान, या आंदोलनाला आणखी वेगळं वळण लागू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. जरांगे पाटील यांच्याबाबत केलेली पोस्ट संबंधित डॉक्टरने आता डिलीट केली आहे. त्याचबरोबर आपल्याकडून चुकून अशाप्रकारची पोस्ट झाल्याची कबुली डॉक्टरने दिलेली आहे. त्यामुळे या वादावर आता तात्पुरता स्वरुपाचा पडदा पडल्याचं बघायला मिळत आहे.