नाशिक (प्रतिनिधी) :- मंत्री छगन भुजबळ यांना मोबाईलवर धमकीचा मेसेज आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की आज दुपारच्या सुमारास राज्याचे अन्नपुरवठा, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईल क्रमांकावर एका नंबरवरून धमकीचा मेसेज आला. तू जास्त दिवस राहणार नाहीस, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही. तू नीट राहा. नाही तर तुला बघून घेईन, अशा आशयाचा मेसेज अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांना मोबाईलवर पाठविला.
ही माहिती मिळताच कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्या नंबरवरून मेसेज आला, तो नंबर कोणाचा आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.