विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. याच दरम्यान महाविकास आघाडीला उत्तर कोल्हापूर मतदारसंघातून मोठा धक्का बसला आह. उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही क्षण बाकी असताना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली.
काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण यामुळे महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला. कारण आता उत्तर कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अधिकृत असा एकही उमेदवार नाही.
उत्तर कोल्हापूरच्या सध्याच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली. पण जयश्री जाधव या आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही होत्या. असं असताना पक्षाने आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर जयश्री जाधव आणि राजेश लाटकर यांच्या विरोधातील पक्षातील एक गट तीव्र नाराज झाला होता. या दरम्यान जयश्री जाधव यांनी टोकाचा निर्णय घेत थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे काँग्रेसला उत्तर कोल्हापूरचा उमेदवार बदलावा लागला.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने मधुरिमा राजे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. पण असं असताना राजेश लाटकर हे आपल्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या बंडाला थोपवण्यासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती स्वत: राजेश लाटकर यांच्या घरी गेले. पण राजेश लाटकर सकाळी साडेआठ वाजेपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत होती.