कोर्टाने खडसावल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष जुनंच वेळापत्रक सादर करणार; कारण...
कोर्टाने खडसावल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष जुनंच वेळापत्रक सादर करणार; कारण...
img
Dipali Ghadwaje
शिवसेना-राष्ट्रवादी आमदार आपात्रता प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान मागील सुनावणीवेळी आमदार आपत्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तयार केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (आज) सुधारीत वेळापत्रक सादर करावे असे निर्देश दिले होते. मात्र, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन यापूर्वी तयार केलेलं वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती आहे.

विधानसभा अध्यक्ष आधी बनवलेल्या वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर, न्यायालयाने लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकात बदल करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतल्याची माहिती आहे.

विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेलं वेळापत्रक

13 ऑक्टोबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी पार पडणार होती. त्यानंतर 20 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की, नाही याबाबत निर्णय घेणार होते. तर 23 ऑक्टोबरला क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू होणार होतं. 23 नोव्हेंबरनंतर पुढच्या तारखा जाहीर करू असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं होतं.

मात्र गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तीव्र शब्दांत फटकारलं आणि सुधारित वेळापत्रक दाखल करण्यास सांगितलं होतं. मात्र, आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष तेच वेळापत्रक दाखल करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सादर केलेल्या वेळापत्रकात काय चूका आहेत, त्या न सांगता थेट दुसरं वेळापत्रक मागवल्याने अध्यक्ष ही भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी सादर केलेल्या वेळापत्रकातील चुका सांगितल्या तर अध्यक्ष दुसऱ्या वेळापत्रकाबद्दल विचार करणार असल्याची माहिती समजतेय. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group