लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी, आतापासूनच राजकीय रण तापलं आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून लोकसभा मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पवार लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीत पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर स्वतः शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय शरद पवार यांनी लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीत जाहीर केला. आगामी निवडणुकांमध्ये राज्यभरात दौरे करणार असून, संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितले. पक्ष बळकट करण्यासाठी राज्यासह देशातही दौरा करण्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत शरद पवार यांनी हा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी लढायचं आहे आणि नवीन लोक आपल्या संपर्कात येत आहेत, असा दावा केला. मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचनाही पवार यांनी उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या.