35 हजार रुपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी व वरिष्ठ सहाय्यक यांना अटक
35 हजार रुपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी व वरिष्ठ सहाय्यक यांना अटक
img
Dipali Ghadwaje
 नाशिक (प्रतिनिधी) :- रिक्त पदावर बदली करण्यासाठी 51 हजार रुपयांची लाच मागून पहिला हप्ता म्हणून 35 हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकाऱ्यासह वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राकेश दिनकर साळुंखे (रा. देवगिरी व्हॅली, छत्रपती संभाजीनगर) व वरिष्ठ सहाय्यक विजय गोरख पाटील (रा. विकास कॉलनी, साक्री रोड, धुळे) अशी लाच घेताना अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांनी त्यांची धुळे तालुक्यातील रिक्त असलेल्या पदावर बदली होण्यासाठी धुळ्याच्या जिल्हा परिषदेत विनंती अर्ज केला होता. या अर्जावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धुळे यांना प्रस्ताव सादर करून त्यांच्याकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखेने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपये विजय पाटीलकडे देण्यास सांगितले, तसेच विजय पाटीलने स्वतःसाठी तसेच जिल्हा परिषदेतील अन्य कर्मचाऱ्यांना देण्याकरिता एकूण 66 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 51 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्याबाबत तक्रारदाराने लांचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार त्यांनी सापळा रचला. लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता 35 हजार रुपयांची लाच शिक्षणाधिकारी कार्यालयात घेताना विजय पाटीलला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, रामदास बरेला, संतोष पावरा, मकरंद पाटील व प्रशांत बागूल यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group