संक्रातीला सर्वत्र पतंग उडवली जाते. परंतु पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाला बंदी घातली आहे. मात्र लोक छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकत घेत असल्याचे दिसून येत आहे. कारण नायलॉन मांजामुळे पक्षीच नव्हे तर मानवाचाही मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहे.
नाशिक शहरात नायलॉन मांजाने एका युवकाचा बळी गेला. त्यानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. इमारतीच्या टेरेसवर जाऊन नायलॉन मांजा वापरणाऱ्या विरोधात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना देखील ताब्यात घेतले आहे. तसेच नाशिक शहरात नायलॉन मांजा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या १४ पालकांना अटक केली आहे. नायलॉन मांजामुळे मृत्यू होत असल्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली. या प्रकरणी कायदा करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.
नाशिकमध्ये ५४ गुन्हे दाखल
नाशिकमध्ये मांजा वापरणाऱ्यावर तीन दिवसांत विविध पोलीस ठाण्यात ५४ गुन्हे दाखल झाले आहे. तसेच एकूण ७० आरोपींना ताब्यात घेतले आहे. जे मुले अल्पवयीन आहेत, त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नाशिक शहरातून 14 लाख 24 हजारांचा मांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नायलॉन आणि पांडा मांजा वापर करणाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.