नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेनेने उबाठा गटाला धक्के देणे अजून चालू ठेवले असून विधानसभा निवडणुकीत भरभरून यश दिल्याबद्दल आभार यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.१४ रोजी नाशिक शहरात येणार आहेत.
यावेळी होणाऱ्या जाहीर सभेत शिवसेना उबाठा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माजी नगरसेविका रंजना बोराडे आणि शिवसेना उबाठा गटाचे दीपक दातीर यांनी आज दिल्ली येथे शिवसेनेचे नेते व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात आज शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव सोहळा असल्याने नाशिकमधून काही हितचिंतकांनी थेट दिल्ली येथे जाऊन सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने युतीला भरभरून यश दिल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आभार व्यक्त करीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी त्र्यंबक रोड वरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
या सभेच्या निमित्ताने काँग्रेस, शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
या प्रवेशासंदर्भात चर्चा करण्यासाठीच तिन्ही पक्षांचे माजी नगरसेवक पदाधिकारी आज दिल्ली येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असून त्यांनी पक्षप्रवेश हा संदर्भात चर्चा केली असल्याची विश्वासनीय माहिती सूत्रांनी दिली.