नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शहरातील बांधकाम व्यावसायिकाकडून ७५ लाखांची मागणी करून न दिल्याने खोटा विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक राहुल रामचंद्र राठी (नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राठी व त्यांच्या भागीदारांचे कनक डेव्हलपर्स असून या फर्मच्यावतीने तपोवन रोड येथे ईश्वर प्रतिक ग्रँड हा गृह प्रकल्प आहे. या प्रकल्पातील युनिटची विक्री करण्यासाठी संशयित आदित्य अवस्थी व त्याची महिला सहकारी राठी यांच्या कार्यालयात येत संपर्क साधला.
गृह प्रकल्प युनिटची विक्री करून देवू. त्या बदल्यात २% कमिशन असा व्यवहार ठरला. त्यानुसार त्यांनी काही युनिटची विक्री केली. मार्केटिंगसाठी संशयितांनी ३५ ते ४० लाख खर्च करून घेतला. या खर्चानुसार युनिटची विक्री होत नसल्याने दोघांना सूचनाही देण्यात आली. मात्र त्यानंतर संशयितांनी विक्रीसाठी घेतलेला स्टाफ काढून घेत हात वरती केले.
त्यानंतर राठी व भागीदारांनी पैशांची मागणी केली असता शाब्दिक बाचाबाची असता दोघे संशयित शिवीगाळ व धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून आदित्य अवस्थीसह महिलेने ७५ लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करू असे वारंवार धमकावले.
अखेरीस १४ फेब्रुवारीस विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे राठी यांनी पोलीस ठाण्यात जात आपली कैफियत मांडली. बांधकाम व्यावसायिक राठी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात आदित्य अवस्थी व त्याची महिला सहकारी यांच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहे.