पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून गोवर्धन शिवारात गोळीबार
पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून गोवर्धन शिवारात गोळीबार
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- गावात दहशत पसरविणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्याचा राग आल्याने तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षावर गोळी झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.

याबाबत पोलिसांनी सांगितलेला तपशील असा की, नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किशोर पिराजी जाधव यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आज फिर्याद दिली. 

या फिर्यादित म्हटले आहे की, दि. 21फेब्रुवारी 2025 रोजी गोवर्धन गावातील काही तरुणांनी गावात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने काही लोकांच्या घराची पत्रे व मोटार सायकलिंची तोडफोड करून मारहाण केली होती. जाधव यांच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड केली. याबाबत पवन राजेंद्र पवार यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

काल (दि. 22) सायंकाळी 6.35 च्या सुमारास किशोर जाधव, अनिता महेश गडाधरा, शंकर रामचंद्र पाटील, बाळासाहेब रंगनाथ पाटील, रंजना राहुल बेंडकोळी, मंदाबाई ईश्वर गुंजाळ, कचरू सोनाजी पवार असे जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर  खुर्च्या टाकून सामाजिक कामाविषयी चर्चा करीत होते.

त्यावेळी अशोका कॉम्प्लेक्स कडून काही मुले पायी येऊन शिवीगाळ करीत जाधव यांच्या कार्यालयाकडे येताना दिसले. त्यामध्ये रोशन दिलीप जाधव, तुषार विठ्ठल कापसे, गौरव उर्फ बाळा जयराम माडे, राहुल दिलीप जाधव, अजय मनोज कापसे व इतर 3-4 मुले दिसली. रोशन जाधवच्या हातात पिस्तूल, तुषार कापसे व गौरव माडे यांच्या हातात तलवारी होत्या. ती सर्व मुले जाधव यांच्या कार्यालयासमोर आली.

रोशन जाधवने त्याच्या हातातील पिस्तूल जाधव यांच्यावर रोखून आमच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी लोकांना पोलीस ठाण्यात पाठवतो काय, आता तुला मारूनच टाकतो असे बोलला आणि तो जाधव यांच्यावर पिस्तूलातून गोळी झाडून जिवे ठार मारणार तितक्यात जाधव यांनी त्याच्या हातातील पिस्तूलला खालच्या बाजूने मारल्याने पिस्तूल मधील गोळीचा हवेत बार झाला. या घटनेने तेथे उपस्थित असेलेले लोक घाबरून गेले.

त्यावेळी तुषार कापसे व गौरव माडे यांनी तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करून "तुमचा गेमच करतो" अशी धमकी देऊन निघून गेले. घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांनी तिथे पडलेली पिस्तूल मधील पुंगळी ताब्यात घेतली.

अशा अर्थाच्या फिर्यादिवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीपैकी काही जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group