गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चमक पाहायला मिळाली आहे.
आयात शुल्कांबाबत अमेरिकेच्या धोरणांमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. त्याचबरोबर डॉलरच्या सततच्या घसरणीमुळंही त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरदेखील होत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याचा भाव वाढला आहे. चांदीच्या किंमतीदेखील वधारल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर आज सोनं आणि चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. एक्सचेंजवर आज सोन्याच्या वायदा 240 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,500 रुपयांवर पोहोचला आहे.
मागील आठवड्यात 89,796 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत हा दर स्थिरावला होता. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. MCXवर चांदीचा मे महिन्याचा वायदा 460 रुपयांनी वधारून 97,954 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर याचा रेकॉर्ड हाय 104072 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 500 रुपयांनी घटून 87,300 प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावली आहे. तर, चांदी 300 रुपयांनी कमी होऊन 97,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात करण्यात येण्याची शक्यता असल्याने सोनं-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.