गेल्या महिन्यात शिंदेगावातील एमडी ड्रग्जचा कारखाना मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी दुसरा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या तपासी पथकाने दोघांची मंगळवारी (ता. ७) कसून चौकशी केली.
४ ऑक्टोबरला साकीनाका पोलिसांनी शिंदेगाव परिसरातील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकून सुमारे ३०० कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईमुळे खडबडून जाग आलेल्या नाशिक पोलिसांनी ८ ऑक्टोबरला त्याच परिसरातील दुसऱ्या कारखान्यावर छापा टाकून सहा कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या दोन्ही कारखान्यांचा संबंध ड्रग्जमाफिया ललित व भूषण पाटील बंधूंशी होते.
त्यामुळे नाशिकमध्येच दबा धरून असलेल्या साकीनाका पोलिसांनी या कारखान्याचा भाडेकरार असलेल्या समाधान कांबळे व उमाशंकर यादव या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला होता.
मात्र त्यांच्याकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने त्यांना सोडून दिले होते. या दोघांना नाशिक शहर पोलिसांनी तपासाकामी चौकशी केली. चौकशीतून पोलिसांना माहिती समजू शकली नसली तरी दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.