मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण पोलीसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात आला असून साल २०१० मध्ये पोलीसांनी बजावलेली तडीपारीची नोटीस न स्वीकारल्याबद्दल हा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी साल २०११ मध्ये राज ठाकरेंनी कल्याण कोर्टात हजेरी लावत जामीन मिळवला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें विरोधात दाखल प्रकरणात उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंना मिळणार का दिलासा? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता.
२०१० मध्ये कल्याण पोलीसांनी बजावलेल्या तडीपार नोटीसच्या प्रकरणात राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने सुरू केलेली कारवाई रद्द करण्यासाठी याचिका केली होती. १५ ऑक्टोबरला न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर अंतीम सुनावणी झाली होती.
त्यावेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. आज हायकोर्टाने यावर निकाल देताना कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.