१६ नोव्हेंबर २०२३
नाशिक (प्रतिनिधी):-उपनगर परिसरात गुंडगिरी करणारी आणि अनेक गुन्हे दाखल असलेली महिला भारती साहेबराव अहिरे (वय ४५, रा. भारती रो हाऊस, जयभवानी रोड, नाशिकरोड) या गुंड महिलेविरूद्ध पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, उपनगर येथील भारती साहेबराव अहिरे यांच्या विरोधात वेळोवेळी साथीदारांच्या मदतीने नागरिकांना क्रुरपणे वागणूक देऊन मारहाण करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, अनाधिकृतपणे घरात घुसून स्वत:च्या अब्रुनुकसानीची धमकी देऊन खंडणी मागणे, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणे या व अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारी होत्या.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणार्या व समाजाचे स्वास्थ्य बिघडविणार्या गुन्हेगारांची यादी करण्याचे आदेश दिले असून, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपारी आणि एनपीडीए कायद्याच्या तरतूदीनुसार प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याच मोहिमेअंतर्गत भारती अहिरे यांच्याविरूद्ध पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ दोनच्या उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत तसेच नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली या महिलेविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
याच मोहिमेअंतर्गत चालू वर्षात परिमंडळ २ हद्दीतून ६१ लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, तर तडीपार केलेले असताना त्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात मिळून आलेल्या २० गुन्हेगारांना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापुढेही शहर व जिल्ह्यात तडीपार गुंड मूळ ठिकाणी परतलेले आढळल्यास त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती परिमंडळ २ च्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.
Copyright ©2024 Bhramar